
जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष; रनप पुतळे उभारण्यात व्यस्त
रत्नागिरी ः रत्नागिरी नगर पालिकेवर प्रशासक आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत पालिकेचे काम सुरू आहे. असे असताना पालिका जीवनाश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून शहरात पुतळे उभारून शहराला मेकअप करण्याच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, शहराध्यक्ष रमेश शाहा यांनी पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी मध्यरात्री शीळ धरणातील जॅकवेल जमीनदोस्त झाली. याला सर्वस्वी नगर पालिकाच जबाबदार आहे. नगर पालिकेत असलेल्या अभियंत्यांना जॅकवेल कोसळणार हे कसे कळले नाही. अभियंते केवळ माफिया बिल्डरांसाठीच आहेत का? त्यांना जनतेच्या अत्यावश्यक बाबींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही का? असा प्रश्न श्री.रमेश शाहा यांनी उपस्थित केला.
सुधारीत नळपाणी योजनेचे काम सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यातच जॅकवेलचे काम पूर्ण करून जुन्या जॅकवेलऐवजी नवीन जॅकवेलमधून पाणी पुरवठा पालिकेने सुरू करणे गरजेचे होते. परंतु पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे जॅकवेल कोसळली. यामुळे शहरवासीयांनी पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. याला पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप श्री.शाहा यांनी केला आहे.
आम्ही प्रशासक आहोत, आम्हाला वाट्टेल तसे करू असे जर पालिका प्रशासनाला वाटत असेल तर अशा भ्रमात राहू नका, काँग्रेस तुम्हाला जाब विचारेल. पंधरा दिवसांत नवीन जॅकवेल कार्यान्वित झाली नाही तर काँग्रेस शेकडो कार्यकर्त्यांसमवेत पालिकेवर धडक मोर्चा काढेल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी दिला आहे.
जॅकवेल कोसळली, पाणी पुरवठा ठप्प झाला, दोन्ही कर्मचारी सुदैवाने बचावले या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे? याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी श्री.शेकासन यांनी केली.