
पालीत ऐन गणेशोत्सवात नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामांमुळे घराकडे जाण्याचे मार्ग बंद
ग्रामस्थ आक्रमक
रत्नागिरी: नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पाली गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूची माती खणणे व भराव करण्याचे काम गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. मात्र आता काम अपूर्ण ठेवून बंद करण्यात आल्याने तेथे मोठय़ा प्रमाणावर जवळपास एक फुटाचा मातीचा चिखल निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थांच्या घराकडे जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला आहे.
केवळ कंत्राटदारांच्या चुकीमुळे ऐन गणेशोत्सवात होणार्या त्रासामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने पाली मध्ये ग्रामीणरुग्णालयाच्या विरुद्ध बाजूला मोठय़ा प्रमाणावर माती पसरवून ठेवल्याने सर्वत्र चिखल होऊन घराकडे जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला आहे तर साठरे गावातील काही ठिकाणी रस्त्याच्या ऐका बाजूची माती खणण्याचे करण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू करून आता अपूर्ण ठेवून बंद केल्याने तेथे १४ ते १५ फुट उंचीची मोठी खोल दरी सारखा भाग झाल्याने लगतच्या शेतकर्यांना त्यांच्या शेती, बागायती जमिनीत जाण्या येण्याचा मार्गच बंद झालेला असल्याने त्यांची ऐन हंगामातील शेतीची कामे थांबून नुकसान होत आहे.शिवाय चौपदरीकरण करताना आलेली माती, झाडांचे बुंधे, मोठे दगड ही घाण संपादन हद्दीच्या बाहेर शेतकर्यांच्या चांगल्या जागेत आणून टाकलेली असल्यानेही त्रास होत आहे.
येथील स्थानिक शेतकरी, जमीन मालक यांनी या ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींशी या गैरसोयीबाबत ऐन गणेशोत्सवात जाण्या येण्यासाठी तात्पुरता मार्ग करुन देण्याची विनंती केली असता ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामूळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेती जमिनीत व घराकडे जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला असल्याने याची प्रशासनाने दखल घेऊन ठेकेदाराकडून किमान तात्पुरता मार्ग करून देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
